मराठी भाषेत भरपूर वापरात असणाऱ्या अनेक शब्दांची व्युत्पत्ती अरबी आणि फारसी भाषेत आढळते. त्यातलाच एक शब्द, हरकत.
अरबी भाषेत बहुतेक शब्द अगदी शास्त्रसोक्त नियमानुसार बनवले जातात. ह्या सर्व शब्दांचा जो पाया असतो, तो मूल शब्द (root word) हा बहुतांशी तीन व्यंजनांनी बनलेला असतो. इथे ही तीन व्यंजने आहेत ‘ह र क. ह्यात जे पहिले व्यंजन आहे, ते मराठी “ह” सारखेच आहे पण त्याचा उच्चार खूपच जास्त कंठीय आहे. इतका की त्याचा अचूक उच्चार मराठी भाषिकांसाठी अशक्यच म्हणावा.
ह्या तीन व्यंजनांना (‘ह र क) वापरून जे शब्द बनतात त्याचा संबंध असतो “हालचाल, गती, ढवळणे” (movement, motion, stir) अशा अर्थांशी निगडित. त्या सर्व शब्दांमधून माझ्या माहितीत तरी दोनच शब्द उर्दूत आले, आणि त्यातला एकच शब्द मराठीत आला.
अरबीमध्ये ह्या व्यंजनापासून बनणारा एक शब्द आहे ‘हरका (حَرَكَة), आणि त्याचे बरेच अर्थ आहेत - movement, motion, stirring वगैरे. अरबीमध्ये त्या शब्दाचे अनेकवचन आहे ‘हरकात (حَرَكَات). ह्याच दोन शब्दावरून फारसी मध्ये शब्द आला ‘हरकत, आणि त्याला अजून एक अर्थ मिळाला - कार्य (act, action).
हिंदी आणि उर्दू मध्ये, ‘हरकत हा शब्द सहसा त्याच अर्थाने वापरला जातो, आणि तोही जरा वाईट अर्थाने. उदाहरणार्थ, “ऐसी हरकते सिर्फ तुम कर सकते हो”. उर्दू शब्दकोशामध्ये जरी “अडथळा” हाही अर्थ दिला असला, तरी तो तितक्या प्रचारात आढळत नाही.
जो दुसरा शब्द उर्दूत आला तो आहे, ते’हरीक (تحریک). हा शब्द बहुतांशी राजकीय आणि सामाजिक संदर्भात वापरला जातो. त्याचा अर्थ आहे - चळवळ (movement), अगदी मूळ अरबी अर्थानुसार.
आपण मराठी मध्ये, मराठमोळ्या उच्चाराने शब्द घेतला - हरकत. आणि त्याच्या अर्थात वृद्धी केली. जेंव्हा आपण गायनातल्या हरकतींबद्दल बोलतो, तेंव्हा अरबी भाषेतील मूळ अर्थापासून तसे आपण दूर नसतो. पण जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीला हरकत घेतो, तेंव्हा आपण त्याला आक्षेप असा एक नवीनच अर्थ देतो!!
जेंव्हा एखादी भाषा इतर भाषेतील शब्द सहजरित्या आपलेसे करून घेते, तेंव्हा त्या भाषेची समृद्धी वृधिंगतच होते.
आशा आहे, माझ्या ह्या वक्तव्याला तुमची हरकत नसावी!