Monday, January 4, 2021

अफलातुन

 अफलातुन !

आजच्या काळात सांस्कृतिक देवाण-घेवाण अगदी सहज होते. फार पूर्वी दोन संस्कृती एकमेकींना भेटायचे प्रमुख कारण दुर्दैवाने युद्धच असावे. विजेत्यांची संस्कृती पराभूतांवर लादली जात असेलही, तरी काही गोष्टी मनापासून स्विकारल्या जायच्या. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान अशा वेळी एका समाजातून दुसऱ्या समाजात पसरले गेले, आणि क्वचित प्रसंगी नावे देखील. 


Alexander The Great हा Macedon नावाच्या एका ग्रीक प्रांताचा राजपुत्र. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने सुरु केलेल्या आक्रमणातून इतिहासातील एक विस्तृत साम्राज्य उभे झाले. Alexander ने नरसंहार खूप केला तरी त्याने जे प्रदेश जिंकले तिथे त्याचे नाव मात्र लोकं लावतात. आज ही सिकंदर हे एक नाव म्हणून प्रचलित आहे. “मुक़द्दर का सिकंदर”, “जो जीता वही सिकंदर“ अशा तऱ्हेने सुद्धा ह्या नावाचा वापर वाक्प्रचारात आणि काव्यात दिसतो.


याद रख सिकंदर के हौसले तो आली थे

जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे

(चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा - क़व्वाली)


Alexander ला The Great अशी उपाधी आपण लावतो ती योग्य असो नसो, त्याचा गुरु Aristotle मात्र महान होता यात तिळमात्र ही शंका नाही. जसं Alexander चा सिकंदर झाला, तसा Aristotle चं नाव अरबी भाषेत “अरस्तु” (أرسطو) असं झालं. जर आजच्या काळातही Aristotle च्या बुद्धिमत्तेने, विचारांमुळे आपण थक्क होतो, तर त्या काळात त्याचा प्रभाव त्या वेळच्या विचारवंतांवर पडला त्यात काही आश्चर्य नाही. ज्या ज्या प्रदेशात Alexander चं साम्राज्य पसरलं तिथे Aristotle ची Philosophy सुद्धा विचारांवर राज्य करू लागली. त्यावरून आधी अरबी आणि नंतर उर्दू/हिंदी मध्ये “फ़लसफ़ा” शब्द आला. इस्लामच्या सुवर्णयुगात बग़दाद मध्ये Aristotle चा अभ्यास आवर्जून व्हायचा आणि त्याचा उल्लेख अतिशय आदराने “The First Teacher” असा केला जायचा.


Aristotle चा गुरु Plato ही तितकाच महान होता. जशी Alexander ची युद्धनीती अजूनही अभ्यासली जाते, तसा Plato चा अभ्यास आजही बऱ्याच क्षेत्रात होतो - उदा. Political Science.


ह्या Plato चं नाव आधी अरबीत, नंतर उर्दू मध्ये आले ते अफ़लातूँ (أفلاطون) असं. मराठीत त्यातल्या अनुस्वाराचा पूर्ण न झाला आणि शब्द झाला अफलातून.


Plato ची बद्धिमत्ता एव्हढी होती की, हे केवळ नाव न राहता एक विशेषण सुद्धा झाले. आपण मराठी मध्ये विशेषण म्हणूनच “अफलातून” चा वापर करतो, आणि तो “विलक्षण”, “अलौकिक” अशा चांगल्या अर्थासाठी.


उर्दू मध्येही तसा वापर होतो. केवळ Plato च नाव म्हणून सुद्धा वापरतात. क्वचित ठिकाणी “फ़लातूँ” असाही शब्द काव्यात आढळतो - कदाचित वृत्तात बसवण्यासाठी हा बदल असावा. ह्या शब्दाचा वापर टोमणा देण्यासाठी सुद्धा उर्दू मध्ये करतात. उदा. “तुम अपने आपको अफ़लातूँ का बच्चा मत समझो”. 


उर्दूचे महाकवी अल्लामा इक़्बाल ह्यांच्या “औरत” ह्या प्रसिद्ध लघुकवितेत त्यांनी फ़लातूँ आणि अफ़लातूँ ह्या दोन्हींचा वापर केला आहे.


मुकालमात-ए-फ़लातूँ न लिख सकी लेकिन

उसी के शोले से टूटा शरार-ए-अफ़लातूँ


(Although she didn’t write the Dialogues of Plato,

From her flames came out the spark of Plato)

Plato च्या Dialogues चा सन्दर्भ देण्यासाठी इंग्लिश मध्ये भाषांतर लिहिलं आहे.


सिकंदर आणि अफ़लातूँ, ही दोन्ही नावं उर्दू/हिंदी/मराठी मध्ये रुळली, पण का कुणास ठाऊक, अरस्तु (Aristotle) आणि सुक्रातु (Socrates) ही नावं रुळली नाहीत. 


अफलातून सारखाच, कौतुक करण्यासाठी आपण ‘कमाल’ शब्द वापरतो. तो सुद्धा अरबी मधून आला आहे. त्याचा अर्थ “निपुणता”, “पूर्णता” असला तरी वापर “पूर्णता”शी निगडित जास्त होतो. उदा. उर्दू मधले मुकम्मल, कामिल वगैरे. तशाच उद्देशाने वापरला जाणारा “ज़बरदस्त” शब्द ही फ़ारसी मधून आला आहे - ज़बर (बलशाली) आणि दस्त (हात) ह्या पासून बनलेला जोडशब्द.

 

मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती मध्ये, अफलातून शब्दाची व्युत्पत्ती सर्वार्थाने अफलातून आहे. :-) 


Related Posts Plugin for WordPress, Blogger...