Sunday, September 6, 2020

इब्लीस कार्ट

आपण मराठी बोलतो की फारसी? 😀

आता हेच वाक्य बघा. . 


इब्लीस कार्ट! रोज ह्याच्या सफेद सदऱ्यावर शाईचे डाग आणि खाकी असूनही खराब झालेले दप्तर. 


ह्यातले किती शब्द फारसी वा अरबी मधून आपण घेतले असं तुम्हाला वाटतं? आश्चर्य वाटेल उत्तर वाचून.


रोज - फारसी मधला रोज़ (روز) म्हणजे दिन, आणि त्यावर आधारित इतर शब्द आपण जसेच्या तसे घेतले. उदा. रोजगार, दररोज इत्यादि. केवळ माहितीसाठी, फारसी मध्ये वर्षाच्या पहिल्या दिवसाला “नौ रोज़” (نوروز) म्हणतात.


सफेद - हाही शब्द फारसी (سفید) मधून आपण जसाच्या तसा अर्थासकट (श्वेत, पांढरा) घेतला. 

शाई - सफ़ेद च्या विरुद्ध फारसीतला रंग “सियाह” (سیاه) अर्थात काळा. “सियाही” (سیاهی) म्हणजे काळिमा आणि शाई  (ink).


ह्या दोन्ही शब्दाना एकत्र करून फारसी मध्ये “सियाह-ओ-सफ़ेद” (अर्थ: काळे पांढरे किंवा संपूर्ण) हा जोडशब्द प्रचलित आहे. उर्दू मधील अग्रगण्य कवी, “मीर तक़ी मीर” च्या एका सुप्रसिद्ध ग़ज़ल मधला एक शेर असा आहे

याँ के सपीद ओ सियह में हम को दख़्ल जो है सो इतना है 

रात को रो रो सुब्ह किया या दिन को जूँ तूँ शाम किया 

(मीर च्या कविता खूप वेळा बोलीभाषेत असतात)


सदरा - अरबी मध्ये “सद्र” (صدر) म्हणजे छाती. (इतर अर्थ आहेत मुख्य, अध्यक्ष, प्रधान वगैरे. उर्दू काव्य संमेलनात हे सम्बोधन तुम्ही नक्की ऐकले असेल). त्या वरून उर्दूत शब्द आला (हा अरबीत सुद्धा असेल कदाचित) - “सद्र:” (صدره ) म्हणजे “छाती झाकणारा”, अर्थात सदरा. 


डाग - उर्दू कवींचा आवडता शब्द दाग़ (داغ) हा फारसीतुन आला आहे. आपणही त्याच अर्थाने वापरतो, फक्त उच्चार बदलून. एवढच नाही, तर आपण त्यावरून “डागळणे” असं अगदी मराठमोळं क्रियापदही बनवलं.


खाकी - फारसी मध्ये “ख़ाक” (خاک) म्हणजे धूळ, माती, राख. आणि “ख़ाकी” म्हणजे मातीशी संबंधित, आणि रंगाचे नाव देखील. आणि सांगायला नकोच, की English मध्ये सुद्धा हा शब्द आला आणि एका तऱ्हेच्या trouser चं नाव होऊन बसला. 


खराब - अरबी मधला “ख़राब” (خراب) आपण घेतला, जसाच्या तसा, अर्थासकट.


अशा सर्व शब्दात आपण “ख़” चा उच्चार “ख” असा करतो, एव्हढाच काय तो फरक. 


दप्तर - अरबी मध्ये “दफ़्तर” (دفتر) म्हणजे वही, notebook. हिंदी आणि उर्दूत त्याचा वापर “कार्यालय” म्हणून जास्त करतात आणि आपण करतो शाळकरी मुलांच्या पिशवी साठी!


मला, ह्या सर्व शब्दांपेक्षा, ज्याची व्युत्पत्ती अधिक मजेशीर वाटते तो म्हणजे इब्लीस. 


इब्लीस - अरबी मध्ये इब्लीस (ابلیس) म्हणजे Devil. आधी सैतान असा अर्थ लिहिणार होतो पण, तोही शब्द अरबी मधील “अल शैतान” (الشيطان) वरून आला आहे. त्याच संदर्भात, खवीस सुद्धा अरबी मधल्या “ख़बीस” (خبيث) वरून आला आहे. जरी सैतान आणि खवीस भीतीदायक गोष्टींसाठी वापरले जात असले, तरी इब्लीस हा शब्द खास मुलांकरता वापरला जातो, किंवा जायचा. हल्ली किती जणांना हा शब्द माहिती असेल, काय ठाऊक.  


शेवटी, इब्लीस शब्दाच्या संदर्भात मला अतिशय आवडणारा एक शेर 

अम्न की जब कभी इंसाँ ने क़सम खायी है

लब-ए-इब्लीस पे हलकी सी हंसी आयी है

- आनंद नारायण मुल्ला 

(Whenever humans have vowed to bring peace,

A faint smile has crossed the Devil’s lips)

Trivia : Anand Narayan Mulla was a judge in Allahabad High Court, a member of Lok Sabha, then a member of Rajya Sabha. He is also a recipient of the prestigious Sahitya Academy Award.


A related post on Marathi etymology : हरकत - अरबीतुन मराठीमध्ये

1 comment:

  1. वकिल या पेशावर प्रसिध्द हिंदी/ उर्दू पंक्ती:
    जब वकिल पैदा हुआ तो इब्लिसने कहाँ अल्लाहने मुझे साहेबे औलाद किया 😄

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...