Friday, September 3, 2021

भारतीय संगीताची अरबी/फ़ारसी परिभाषा

शास्त्रीय संगीत हे माझ्या दृष्टीने भारतीय संस्कृतीचा सर्वोच्च ठेवा आहे. काही लोकांचा अशा विधानाला आक्षेप असेल, काहींना राग येण्याचीही संभावना आहे. गणित, तत्वज्ञान अशा इतर विषयांपेक्षा संगीत मोठं कसं, हा प्रश्न योग्य आहे. पण हे केवळ माझं मत आहे, अजून कोणाचं असावं असा माझा मुळीच आग्रह नाही. मला तरी भारतीय शास्त्रीय संगीत अद्वितीय वाटतं. 


सगळ्यात आधी एक स्पष्टीकरण - ह्या लेखात मी केवळ “उत्तर भारतीय” शास्त्रीय संगीताबद्दल लिहिणार आहे. प्रत्येक वेळी “उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत” असं म्हणायच्या ऐवजी “शास्त्रीय संगीत” असे लिहिणार आहे ते केवळ त्याच्या संक्षिप्त आणि सुटसुटीतपणा मुळे. ह्यात “कर्नाटक संगीत” आणि इतर प्रकार ह्यांना कमी लेखण्याचा हेतू अजिबात नाही.


आज मराठीमध्ये आपण जेंव्हा शास्त्रीय संगीताबद्दल बोलतो, तेंव्हा आपल्या वापरातले बहुतेक शब्द हे मूळचे अरबी किंवा फ़ारसी मधून आलेले असतात. अगदी “बेमालूम” पणे आपण ते वापरतो. जर शास्त्रीय संगीत इतके प्राचीन असेल, तर असं का? म्हणजे धृपद शैली चं नातं जर थेट सामवेदाशी असेल तर हे सगळे अरबी/फ़ारसी शब्द कसे काय रुजले?


हे समजण्यासाठी इतिहासाकडे बघावं लागेल. पृथ्वीराज चौहानचा ११९२ सालचा पराभव हे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख वळण. त्यानंतर दिल्ली वर मुस्लिम राज्यकर्त्यांची शृंखला सुरु झाली. सुरुवातीचे राजे जरी अफगाणिस्तान (आणि आताचं उझबेकिस्तान) मधल्या प्रदेशातून आले असले, तरी त्यांची भाषा फ़ारसी (किंवा फ़ारसी वरून आलेली) होती. ह्यातले बरेच राजे क्रूरकर्मा असूनही काव्य आणि संगीत कलांचे आश्रयदाते होते. 


अमीर ख़ुसरो हा विद्वान आणि “हरफ़न मौला” (polymath) त्याच्या हयातीत दिल्लीच्या बऱ्याच सुलतानांच्या दरबारात होता, अल्लाउद्दीन खिलजी च्या दरबारात सुद्धा.  खुसरो संगीत आणि काव्य ह्या दोन्ही कलात अतिशय निपुण होता. प्राचीन काळापासून असलेल्या “वीणा” वाद्यात त्याने काही बदल केले, आणि तीन तारा वापरून एक नवीन वाद्य बनवले. फ़ारसी मध्ये तीन म्हणजे “सेह” - त्यावरून त्याने नाव ठेवले “सेहतार”, (سہ تار) ज्याचा पुढे अपभ्रंश झाला “सितार”. (आधुनिक सितार मध्ये ३ पेक्षा जास्त तारा असतात.) तार (تار) हा शब्द ही फ़ारसी आहे. जरतारीची पैठणी मराठमोळी असेल, पण ज़र (زر) - अर्थ सोने - सुद्धा फ़ारसी आहे. तसंच सरोद हा शब्दही फ़ारसी आहे (سرود) - अर्थ “मधुर गाणं”.  


अमीर ख़ुसरोच्या नावाने बऱ्याच आख्यायिका आहेत. तबला ह्या वाद्याच्या निर्मितीचे श्रेय जे काही ठिकाणी त्याला दिले आहे, ते चूक आहे असे जाणकारांचं मत दिसून येतं. तबला ह्या शब्दाची व्युत्पत्ती मात्र अरबी मधील तब्ल ( طبل म्हणजे drum) ह्या वरून आहे. तसेच क्वचित प्रसंगी खयाल (अरबी ख़याल خیال - विचार) शैलीचे श्रेय त्याला दिलं जाते ते बहुतेक पूर्णपणे चूक आहे. पण आज “तराणा” म्हणून जो गायन प्रकार आहे, तो नक्कीच अमीर खुसरो मुळे जन्मला. तो शब्द आला फ़ारसी मधल्या “तरान:” (ترانہ म्हणजे गाणं) वरून. “तरन्नुम” (म्हणजे चालीवर म्हणणे) हा त्याच्याशी निगडित असलेला शब्द. आणि आज ज्या तऱ्हेने कव्वाली गायली जाते, ती त्याच्यामुळे.


अमीर खुसरो ने फ़ारसी आणि प्राकृत ह्या दोन्ही भाषांतील शब्दांचा एकत्र वापर अगदी जाणूनबुजून सुरु केला - दोन संस्कृतींना जवळ आणण्यासाठी. त्याने लिहिलेली एक सुप्रसिद्ध ग़ज़ल, ज्यातल्या अर्ध्या ओळी फ़ारसी आणि अर्ध्या ओळी प्राकृत (हिंदवी) भाषेत आहेत, तिचा वापर गुलज़ारनी “ग़ुलामी” चित्रपटातील गाण्यात केला आहे. 

ज़े-हाल-ए-मिस्कीं मकुन तग़ाफ़ुल, दुराय नैनाँ बनाए बतियाँ

कि ताब-ए-हिज्राँ नदारम ऐ जाँ, न लेहू काहे लगाए छतियाँ

(Do not ignore my plight, by looking away and making up tales

I don’t have the patience to suffer separation, why don’t you give me a hug?)


आणि एक गंमत म्हणून माहिती. वरील गज़लेचं फारसी मधून आलेले वृत्त (मुतक़ारिब मुसम्मन मुज़ाअफ़ मक़बूज़ असलम) आजही खूप वापरात आहे. उदा. एक प्रसिद्ध गाणं “न जाओ सैंया, छुड़ा के बैंया, क़सम तुम्हारी मैं रो पड़ूँगी, रो पड़ूँगी”. त्या गाण्याच्या चालीवर वरील शेर म्हणून बघा :-) 


अरबी/फ़ारसी मधले शब्द भारतीय भाषांमध्ये येण्यामध्ये अमीर ख़ुसरो चा मोठा हातभार आहे असं म्हणता येईल.


नंतर मुगलांची सत्ता सुरु झाली आणि ही महत्वाची सांस्कृतिक कला जोपासली गेली आणि विकसित होत गेली. अकबराच्या दरबारी तानसेन होता हे आपण जाणतोच. तानसेन धृपद गायचा, त्याच्या उपलब्ध रचना धृपद मध्ये आहेत. त्यावरून असे अनुमान बांधता येतं की खयाल गायकी त्यावेळी खूप प्रचलित नसावी. 


मुगल राज्यकर्त्यांची संगीताला आश्रय देण्याची परंपरा सुरु राहिली. औरंगझेबाच्या काळात खंड पडला पण त्याचा पणतू मुहम्मद शाह “रंगीला” हा संगीताचा मोठा आश्रयदाता होता. एक राजा म्हणून तो फार निष्प्रभ ठरला. आधी थोरले बाजीराव पेशवे, नंतर इराणचा नादिरशहा (जो मयूर सिंहासन घेऊन गेला) ह्या दोघांकडून त्याला मोठे पराभव पत्करायला लागले. पण त्याच्याच काळात खयाल गायकी प्रतिष्ठित आणि नंतर प्रमाण झाली. 


त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या दरबारातील राज-गायक  “मियाँ नेअमत अली खान साहेब” ज्यांनी खयाल गायकीला आजचं स्वरूप दिलं. “सदारंग” ह्या टोपण नावानी लिहिलेल्या त्यांच्या “चीजा” (फ़ारसी चीज़ چیز) आजही गायल्या जातात - अगदी नवशिक्या विद्यार्थ्या पासून ते भारतरत्न पंडित भीमसेन जोशीं सारख्या महान गायकापर्यंत. ते आणि त्यांचे पुतणे अदारंग ह्यांच्या चीजा अनेक रागांचे प्रमाण बनल्या आहेत. 


ह्याच काळात उर्दूला सुद्धा एका प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळाला. नंतर खयाल गायकीची घराणी बनली. जवळपास सर्व घराण्यांचे संस्थापक मुस्लिम असल्यामुळे उर्दू / फ़ारसी / अरबी शब्द शास्त्रीय संगीताच्या परिभाषेत शिरले आणि आज ही तेच शब्द प्रचलित आहेत.


ह्या शब्दांची यादी खूप मोठी आहे. मैफिल (अरबी महफिल محفل), उस्ताद (अरबी استاد), रियाज (अरबी ریاض), तयारी (अरबी تیّر), तालिम (अरबी त’अलीम تعلیم), वजन (अरबी وزن) अशा शब्दांच्या व्युत्पत्ती बद्दल आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. पण संगीतातला मूलभूत शब्द, आवाज (फ़ारसी آواز) सुद्धा अर्थासकट आला आहे. हरकत बद्दल तर मी आधी लिहिलंच आहे. कदाचित आश्चर्य वाटेल वाचून - दाद (داد) आणि वाह (واہ) शब्ददेखील फ़ारसी मधून अर्थासकट आले आहेत. 


काही व्युत्पत्ती गमतीदार आहेत. “समा बांधला” असा एक प्रयोग केला जातो, तो समा “यह समाँ, समाँ है यह प्यार का” मधला समाँ (अरबी سماں) नाही - त्याचा अर्थ दृश्य. समा (سما) असा अरबीत एक शब्द आहे पण त्याचा अर्थ आहे आकाश. इथे जो शब्द आला आहे त्याचा उगम अरबी मधील “समा’अ” (سماع श्रवण) मध्ये आहे. उर्दू मेहफिलीत श्रोत्यांकरता “सामईन” असं संबोधन तुम्ही ऐकलं असेल. आणि “दर्दी श्रोते” म्हणजे “दुःखी श्रोते” नव्हेत हे सांगायला नकोच. 


संस्कृत मधील स्वर चा अपभ्रंश सूर होण्यास सुद्धा उर्दू / फ़ारसी लिपी कारणीभूत असावी. हा केवळ माझा तर्क आहे. उर्दू मध्ये स्वर लिहिला जाईल سور असा. पण त्या प्रकारे लिहिल्याने उच्चार सूर सुद्धा होऊ शकतो - कारण उर्दू मध्ये लिहिताना बऱ्याच वेळा स्वरचिन्ह गाळली जातात. 


मला आवडणारा एक जोडशब्द आहे - हमनवा - म्हणजे आपल्या बरोबर एका सुरात गाणारा. एका प्रसिद्ध पाकिस्तानी मालिकेचे शीर्षक गीत आहे 

वह हमसफ़र था मगर उस से हमनवाई न थी

(तो सहप्रवासी होता, पण आमचे सूर जुळले नाहीत)


नवा (फ़ारसी نوا) म्हणजे आवाज/स्वर/गाणे. त्यावरून शब्द आला नवाज़. म्हणजे वादक. म्हणून सोबतीला (अरबी सुहबत صحبت) “तबला नवाज़” असतात. नवाज़ शब्दाचा दुसरा अर्थ आहे - कृपा करणारा. जो सेवकांवर कृपा करतो तो “बंद:नवाज़”.

 

ह्यातल्या बंद: चा मूळ फारसी शब्द आहे बंद, त्या वरून बनलेला फ़ारसीतला दुसरा शब्द बंदिश - हा आता शास्त्रीय संगीतातला अतिशय महत्वाचा शब्द बनला आहे. पण ह्या फारसी शब्दाचा मूळ उगम अतिप्राचीन “Proto-Indo-Iranian” भाषेत असू शकेल कारण संस्कृत मधला “बंधन” हा त्याच्याशी खूप मिळताजुळता शब्द आहे. हा ही केवळ माझा कयास आहे, भाषाशास्त्रज्ञांचं मत वेगळं असू शकेल. 


असो. बराच मोठा लेख झाला आहे. ह्या ही पेक्षा अधिक किती तरी शब्द असतील. पण जे शब्द मला पटकन आठवले त्याबद्दल ही थोडी माहिती. 



3 comments:

  1. किती माहितीपूर्ण लेख आहे !
    RMIM पासूनच तुम्हाला follow करत आलो आहे.
    अनेक आभार

    ReplyDelete
  2. शास्त्रीय संगीत हा आपला सगळ्यात मोठा ठेवा आहे हे वादातीत. आणि तो आपल्या ऐक्याचे प्रतीक आहे. खानसाहेब बडे गुलाम अली खान म्हणत की जर प्रत्येक घरात शास्त्रीय संगीत असते तर हिंदू मुसलमान हा झगडा कधीच झाला नसता. असो.

    ReplyDelete
  3. Golden Gate Hotel & Casino - Mapyro
    Golden Gate Hotel & 속초 출장안마 Casino locations, 삼척 출장샵 rates, amenities: expert Golden Gate research, only at 사천 출장마사지 Hotel and Travel Index. Golden Gate 원주 출장안마 Hotel & Casino is a 영주 출장마사지

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...