साबुदाण्याची सांस्कृतिक खिचडी
साबुदाण्याच्या खिचडीची पाककृती शोधून महाराष्ट्राने समस्त भारतवर्षावर अनंत उपकार केले आहेत असं मी ठामपणे बऱ्याच लोकांना सांगितलं आहे. अर्थातच ह्या विधानाला सिद्ध करायला माझ्याकडे काही पुरावा वगैरे नाही आणि असे सगळे वाद केवळ गंमत म्हणून. पाककृतीचा शोध कोणी का लावला असेना, त्याने प्रत्येक घासातला अवर्णनीय आनंद काही कमी होत नाही.
हा अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ किती अस्सल आहे? पाककृती बहुतेक अस्सल मराठमोळी आहे, पण त्यातल्या घटकांचं काय?
सगळ्यात आधी, अस्सल हा अरबी मधून आलेला शब्द (اصل अस्ल = शुद्ध, तत्व, सत्य) ज्याचं अनेकवचन उसूल (اصول). (हो, हो, दीवार मधल्या त्या सुप्रसिद्ध dialogue मधला उसूल). आणि तुम्ही ओळखलं असेलच की नक्कल हासुद्धा अरबी ( نقل नक़्ल) मधून आला असणार.
तर, साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मीठ आणि फोडणीशिवाय चार घटक असतात - साबुदाणा, बटाटा, शेंगदाणा आणि मिरची. ही नावं कुठून आली? आणि मुख्य म्हणजे हे पदार्थ कुठून आले?
बटाटा हा पदार्थ (आणि त्याचं नाव) भारतात पोर्तुगीज लोकांनी आणला हे सर्वश्रुत आहे. बटाट्याचा उगम दक्षिण अमेरिकेतील पेरू ह्या देशात झाला. हे नाव Taíno नावाच्या Carribean भाषेतून आलं आहे जी आता अस्तित्वात नाही. हिंदी मधलं आलू हे नाव फारसीमधून (آلو म्हणजे plum) आले आहे. बटाट्याचा दूरचा चुलतभाऊ रताळं (sweet potato) हा ही अमेरिका खंडातला पदार्थ.
आज स्थानिक मिरचीचा अभिमान खूप ठिकाणी आढळतो. मग ती कोल्हापूरची लवंगी मिरची असो, वा आंध्र मधील गुंतुर मिरची असो. मिरची शब्द संस्कृत “मरिच” वरून आला आहे पण मिरचीसुद्धा अमेरिका खंडात मेक्सिको मध्ये जन्मली आणि युरोपियन लोकांबरोबर जगभर पसरली. आज मिरचीचे असंख्य प्रकार आहेत, दुसऱ्या कुठच्याच फळात इतकी विविधता नसेल. (हो, मिरची हे झाडाचं फळ आहे.) इंग्लिश मधला chilli हा शब्द मेक्सिको मधल्या Nahuatl भाषेतून जसाच्या तसा आला आहे.
आणि शेंगदाण्याचं काय? हो, तोही दक्षिण अमेरिकेमधलाच!
पण दाणा हा शब्द फारसी मधल्या “दान: (دانہ)” वरून आला आहे. आपण अगदी ण वापरून त्याला मराठमोळं करून टाकलं. फारसी मध्ये दुसरा शब्द आहे दाना (دانا) - म्हणजे बुद्धिमान, ज्ञाता. दानिश (बुद्धी) असं नावही आहे. इथे फारसी आणि संस्कृत मधल्या शब्दांचं साधर्म्य सहज जाणवतं. दानिश म्हणजे ज्ञान, आणि दाना म्हणजे ज्ञानी. हा योगायोग नाही. वेदकालीन संस्कृत आणि प्राचीन फारसी ह्यांचा उगम एकाच अतिप्राचीन भाषेतून झाला आहे. (फारसी चा उगम संस्कृत मधून नाही झाला आहे, पुन्हा एकदा स्पष्ट करतो. असो.)
ह्या संदर्भात दोन शेर ऐका, दाना आणि दान: ह्यातला फरक दाखवण्यासाठी. आता ग़ालिब आणि इक़बाल, ज्यांची काव्यप्रतिभा माझ्यासाठी देवस्थानी आहे, त्यांचे शेर सांगण्याची संधी मी कशी सोडेन?
हम कहाँ के दाना थे, किस हुनर में यकता थे
बेसबब हुआ, ग़ालिब, दुश्मन आसमाँ अपना
(मी कुठे कोण बुद्धिवंत होतो, कुठच्या कलेत अद्वितीय होतो
विनाकारण दैवाने माझ्याशी वैर घेतलं)
फार अर्थपूर्ण शेर आहे. पूर्ण गज़लच छान आहे. गज़ल सम्राज्ञी बेग़म अख़्तर ह्यांनी अप्रतिमरित्या गायलेल्या ग़ालिबच्या “ज़िक्र उस परिवश का” गज़लचा हा मक़्ता आहे.
महाकवी इक़बाल ह्यांची कविता अतिशय आध्यात्मिक आणि संकेतात्मक असते, हे ध्यानात ठेवून त्यांच्या एका सुप्रसिद्ध कवितेतल्या पहिल्या ओळी वाचा.
आश्ना अपनी हक़ीक़त से हो, ऐ देहकाँ ज़रा
दान: भी तू , खेती भी तू , बाराँ भी तू , हासिल भी तू
(केवळ शब्दार्थ लिहितो आहे. ह्यातले आध्यात्मिक संकेत तसे स्पष्ट आहेत.
अरे शेतकऱ्या, स्वतःच्याच सत्याशी थोडा परिचित तरी हो
दाणाही तूच, शेतीही तूच, वर्षाही तूच आणि प्राप्तीही तूच)
आता राहिला साबुदाणा. हो, बाकीच्या तीन घटकांसारखा हाही दक्षिण अमेरिकेतूनच आला आहे. Cassava ह्या मूळच्या दक्षिण अमेरिकेतील कंदमुळाच्या पिठापासून साबुदाणा बनतो. ह्याचे Tapioca हे नाव ब्राझील मधून आलं आहे. मात्र पीठांपासून असे गोल दाणे बनविण्याची पद्धत मलेशिया मधून आली आहे.
बघा. साबुदाणा खिचडी सारखा अस्सल मराठमोळा पदार्थ, जो आपण एकादशी सारख्या धार्मिक दिवशी खातो, तो बनवायला लागणारे सर्व मुख्य घटक “परकीय परधर्मीय आक्रमकांनी” भारतात आणले आहेत. तेही केवळ तीन चारशे वर्षांपूर्वी. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग “आपली संस्कृती” म्हणजे नक्की काय?
ह्या प्रश्नात अवघडून जाण्यासारखे काहीच नाही आणि अशी “खिचडी” सर्वत्र आढळते.
हिंदी चित्रपटांनी आपली अशी समजूत करून दिली आहे की, शतकानुशके पंजाबी आया त्यांच्या मुलांना गरम गरम “मक्के दी रोटी” खायला घालत आल्या आहेत. पण हा मका देखील मूळचा अमेरिकेतलाच आहे. यूरोपीय लोंकानी तो जगभर नेला.
भारताबाहेरही सर्व प्रदेशांची हीच गत आहे. स्वित्झर्लंड आणि बेल्जियम मधल्या जगप्रसिद्ध चॉकलेट मधला मुख्य घटक “कोको” (Cocoa bean) मूळचा दक्षिण अमेरिकेतलाच. टोमॅटो शिवाय आज इटालियन जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. हा टोमॅटो सुद्धा दक्षिण अमेरिकेतूनच आला आहे. हे नावसुद्धा मेक्सिकोतल्या Nahuatl भाषेतून आलं आहे. गंमत म्हणजे टोमॅटोचं आगमन जरी चारशे वर्षांपूर्वी युरोप मध्ये झालं, तरी कित्येक दशके त्याचा वापर केवळ शोभेच्या झाडांसाठी व्हायचा. कारण टोमॅटो विषारी आहे, अशी लोकांची समजूत होती. पिझ्झावर टोमॅटोचा वापर सुरु होऊन जेमेतेम दीडशे वर्ष झाली आहेत.
अजून एक. तंबाखू सुद्धा अमेरिकेतलाच. ह्या शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा अमेरिका खंडातल्या जुन्या भाषांमधून आहे.
मूळच्या अमेरिका खंडातल्या ह्या पदार्थांचं आता सर्व जगावर राज्य आहे. कोलंबस ने अमेरिका खंडाचा “शोध” लावल्यामुळे संपूर्ण जगाच्या इतिहासाला जे एक अतिशय मोठं आणि मूलभूत वळण लागले, त्यात जागतिक पाकशैली वरचे परिणाम हा केवळ एक पैलू आहे.
मग “पारंपरिक पाकशैली” म्हणजे नक्की काय? भारत असो वा इटली, जरी प्रदेशांचा इतिहास खूप प्राचीन असला, तरीदेखील किती तरी “परंपरा” त्या मानाने आधुनिक आहेत. केवळ पाककलेत नाही, तर पोशाखात, आचारात, विचारात सुद्धा आधुनिकतेचं मिश्रण सर्व प्रदेशातील सर्व परंपरांमध्ये आढळतं.
आज अशी तक्रार खूप ऐकू येते, की मुलं “आपलं जेवण” जेवत नाहीत, आणि त्यांना सारखा पिझ्झा, पास्ता हवा असतो. पण मला वाटतं, जेंव्हा बटाटा आणि शेंगदाणा असे “परकीय परधर्मीय” पदार्थ आपण आपल्या धार्मिक उपवासांना खाणं सुरु केलं, तेंव्हाही तक्रार झाली असेलच की! पण आपण आपल्या पद्धतीने बटाटा आणि शेंगदाणा असा काही वापरला की आज त्यांच्याशिवाय महाराष्ट्रीय जेवणाची कल्पनाही करवत नाही. मग काही काळानंतर पास्ताचा वापर आपल्या जेवणात आपल्या पद्धतीने होणारच नाही असं कशावरून? फोडणीचा पास्ता छान लागतो. अर्थात फोडणी दिल्यावर काय चांगलं लागत नाही म्हणा? :-)
त्यामुळे माझं असं मत आहे की, संस्कृती ही नेहमीच बदलत असते. सर्वच बदल चांगले असतात असं नाही, पण सर्व बदल वाईटच असतात असं अजिबात नाही. जेंव्हा ह्या बदलांची सवय होऊन जाते, तेंव्हा तीच आपली संस्कृती असं वाटू लागतं आणि त्यात मात्र बदल होऊ नये असा आग्रह धरला जाऊ लागतो. पण महत्वाचं हे, की “आपली संस्कृती” म्हणजे केवळ एका सीमित प्रदेशातल्या हजारो वर्षांपूर्वीच्या प्रथा नाहीत. त्यात जगभरच्या विविध संस्कृतींमधून आलेल्या आणि मिसळून गेलेल्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत.
आता ब्राझीलचंच बघा. Tapioca तिथे हजारो वर्षांपासून खाण्यात आहे, पण त्याचे गोल दाणे त्यांनी कधी बनवले नव्हते. मलेशिया मध्ये, एका प्रकारच्या ताडाच्या झाडांमधून (Sagu) जो पिष्टमय पदार्थ येतो, त्याचे गोल दाणे (Sago Pearls) बनवण्याची खूप जुनी पद्धत आहे. ह्या दोन्ही गोष्टी यूरोपीय लोकांनी जगभर पसरवल्या. मग ब्राझील मधला Tapioca आणि मलेशिया मधली पद्धत ह्यांपासून बनले Tapioca Pearls म्हणजे साबुदाणा. आता ब्राझीलमध्ये ह्या मलेशियन पद्धतीने Tapioca चे गोल दाणे बनवून एक गोड पदार्थ बनवला जातो ज्याचे नाव ठेवलं गेलं आहे - Sagu :-) आणि अशा तऱ्हेने हे वर्तुळ पूर्ण झालं.
विविध संस्कृतींचं विविध प्रकारे सतत होत राहणारे मिश्रण. माझ्यासाठी तरी “वसुधैव कुटुंबकम्” चा हाच खरा अर्थ आहे.
खूपच चांगला लेख. भाषांचा ( किंवा कोणताही) अभ्यास करताना अभिनिवेश व पूर्वग्रह यांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक आकलन पुढे आणत रहावे लागेल . शुभेच्छा .
ReplyDeleteअजित साळुंखे.
खूप धन्यवाद
Delete